मंदिरातील दानपेटी चोरणार्‍या चोरट्यास अटक·

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सिडको एन-५ येथील गुलमोहर कॉलनीतील नर्मदेश्वर मंदिरातून रोख रकमेसह दानपेटी पळवणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १३) आमखास मैदान परिसरातून बेड्या ठोकल्या. दानपेटी कच्ची घाटी येथील तलावात फेकून दिली होती, पोलिसांनी शोधून काढत हस्तगत केली आहे. 
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्याचे इतर दोन साथीदार फरार आहेत. अमजदखान सलीमखान (२८, रा. जलाल कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर, नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा (रा. कच्ची घाटी) आणि इम्रान खान युनूस खान (रा. कटकटगेट) हे आरोपी फरार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
६ ते ७ जुलैदरम्यान चोरट्यांनी नर्मदेश्वर मंदिरात प्रवेश करून रोख रकमेसह दानपेटी, पितळी समया आणि पितळी नंदादीप चोरून नेला होता. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक आयुक्त मझहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक अमोल देशमुख, दिलीप मोदी, प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, संदीप तायडे, विलास मुठे, बाळू नागरे, शैलेश आस्कर आणि तातेराव शिंगारे यांच्या पथकाने केली.